पिंपरी:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन उपमहापौर शर्मीला बाबर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे संपन्न झाले .
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तृतीयपंथीय समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक स्वीकार यावर भर देत मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन नारी द वुमन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख व उपाध्यक्षा अर्चना मेंगडे यांनी केले होते.
या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मीला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे,सामाजिक समरसता गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक विलास लांडगे,सामाजिक समरसता गतिविधी प्रांत मंडळाचे सदस्य ॲड. मुकुंद यदमळ,डॉ. आम्रपाली मोहिते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपमहापौर बाबर म्हणाल्या की, समाजाने तृतीयपंथीयांकडे दयेच्या नव्हे तर समानतेच्या आणि सन्मानाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असून, तृतीयपंथी असणे हा कोणताही शाप नसून तो निसर्गाचा स्वीकार आहे.रोजगाराच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना सक्षम बनविणे आवश्यक आहे. ‘नारी द वुमन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे तसेच या उपक्रमाशी संबंधित सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेले हे समुपदेशन केंद्र राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल.महानगरपालिका विविध कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असून, तृतीयपंथीयांनी या संधींचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
तृतीयपंथीयांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.”परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. तृतीयपंथीय असणे हा शाप नाही. समाजाने अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून त्यांना शिक्षण, रोजगार आणि समान संधी द्यायला हव्यात,” महानगरपालिकेने तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेले उपक्रम देशासाठी आदर्श ठरतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना हा राज्यातील पहिला आणि वेगळा प्रयोग असल्याचे सांगितले.”अर्चना मेंगडे यांच्या संकल्पनेला तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी गती दिली. आज तृतीयपंथीय महानगरपालिकेत विविध पदांवर काम करत आहेत. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी हे समुपदेशन केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे,” तसेच तृतीयपंथीयांसाठी भविष्यात आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही कांबळे यांनी दिली.
