पुणे- अल्पवयीन आरोपींना कारच्या बॉनेटला बांधून त्यांची धिंड काढल्याप्रकरणी पुणे पोलिसांची प्रतिमा मालिन झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोलीस कर्मचारी उपस्थित राहिल्याचे उघडकीस आले आहे. या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शुभम विजय सूर्वे, योगेश भागचंद्र एकशिंगे आणि अभिजीत अनिल शिंदे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला पुणे पोलीस दलातील हे तीन कर्मचारी उपस्थित राहिले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी जवळीक ठेवणे आणि त्यांच्या खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे पोलिस दलाच्या शिस्तीला धरून नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून तिन्ही कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. कर्तव्यात बेफिकिरी, बेजबाबदार वर्तन आणि पोलिस दलाची शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
