जुन्नर – भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ज्येष्ठ नेत्या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके यांचे अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारनंतर जुन्नर तालुक्यातील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुचके या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. महिलांचे मोठे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पुणे जिल्ह्यात आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.
आशाताई बुचके यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि सुमारे १५ वर्षे शिवसेनेत काम केले. त्या पुणे जिल्हा परिषद सदस्या व गटनेत्या म्हणूनही कार्यरत होत्या. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतरही त्या राज्य समिती आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सक्रिय राहिल्या.
जुन्नर तालुक्यात एक आक्रमक, स्पष्टवक्त्या आणि लढाऊ महिला नेत्या म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. जनसामान्यांच्या व ग्रामीण भागातील प्रश्नांवर त्या नेहमी आक्रमकपणे आवाज उठवत असत.
त्यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
