ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन

Share

पुणे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे आज शनिवारी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

रत्नाकर महाजन यांच्या जाण्याने काँग्रेसचा अभ्यासू, संयमी आणि निष्ठावंत नेता हरपला अशी भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

रत्नाकर महाजन हे राज्य नियोजन महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्षपदही भुषविले होते. समाजवादी विचारवंत , राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसशी शेवटपर्यंत इमान कायम राखणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. रत्नाकर महाजन हे डॉक्टर होते. मात्र, समाजवादी विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. रत्नाकर महाजन यांनी आणीबाणीच्या काळात सक्रियपणे काम केले होते. त्यांना त्यावेळी तुरूंगवासही सहन करावा लागला होता. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान आदी पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा पगडाही त्यांच्यावर होता.

डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसची पिछेहाट होत असताना पक्षाची बाजू प्रभावीपणे आणि जोरसकपणे लावून धरण्याची जबाबदारी रत्नाकर महाजन यांनी योग्यपणे पार पाडली.