पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व १० क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आलेल्या या कारवाईत एकत्रितपणे सुमारे ८३ हजार ९९ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि अतिक्रमण मुख्य कार्यालय उप आयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये आर.सी.सी. स्वरूपाची अनधिकृत बांधकामे, अनधिकृत पत्राशेड, नव्याने सुरू असलेली बांधकामे तसेच पदपथावरील अनधिकृत टपऱ्या, हातगाडे आणि इतर अतिक्रमणांचा समावेश आहे.
अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अंदाजे ३ हजार ४९८ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील १० हजार ५३८ चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. क क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत १२ हजार ७२३ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.
ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ५ हजार ४०० चौरस फूट, तर ई क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात ७ हजार ९६५ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात सर्वाधिक १९ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.
ग क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात १३ हजार ३५ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात १ हजार ८६ चौरस फूट, ज क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात ६ हजार २८ चौरस फूट, तर ल क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात ३ हजार ४२६ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.
