ब्रेकिंग न्यूज

पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राने पत्नीच्या मदतीने केली मित्राची हत्या

Share

पुणे – एकाच खोलीत सोबत राहणाऱ्या मित्राने आपल्या पत्नीच्या मदतीने मित्राची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या करून मृतदेह पोत्यात भरून निर्जन ठिकाणी फेकून दिला. शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत पती-पत्नी दोघांनाही जेरबंद केले आहे.

गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मुकेश विठ्ठल सोनवणे आणि मुकेशची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय 19) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरवची आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धक्कादायक घटनेची माहिती अशी की, शिक्रापूर येथील करंजेनगरच्या एका मोकळ्या मैदानात, झुडपांमध्ये पोत्यात भरलेला एक अज्ञात तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत सोशल मीडिया आणि खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे हा मृतदेह गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले.

मृत गौरव हा करंजेनगर येथे त्याचा मित्र मुकेश विठ्ठल सोनवणे आणि मुकेशची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय 19) यांच्यासोबत रूममेट म्हणून राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गौरव आणि मुकेश यांच्यात अनैतिक संबंधांच्या संशयावरून वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच संशयाच्या धाग्यावरून पोलिसांनी तात्काळ मुकेश आणि जान्हवीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. त्यामधून मुकेश आणि जान्हवी या दोघांनी गौरवाची हत्या केल्याचे उघड झाले.