पुणे – खराडी आणि वारजे माळवाडी परिसरात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध पुणे महापालिकेच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीने कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीकडून ही मोहीम राबवण्यात आली. पहिल्या कारवाईत खराडी येथील जुना मुंढवा रोडवरील ‘श्री विघ्नहर्ता पॉलीक्लिनिक’मध्ये धीरज दिलीप येवले (वय २९, मूळ रा. चाळीसगाव, जळगाव) हा परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळले. येवले याने जुलै २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत कोणतीही वैध नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केले.
तसेच, विश्रांतवाडी येथील कस्तुरबा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका महिला आयुर्वेदिक डॉक्टरचा नोंदणी क्रमांक खोट्या पद्धतीने वापरून रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. येरवड्याचे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ उजणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण प्रकाश नरवडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुसऱ्या कारवाईत वारजे माळवाडी येथील ‘गुरुकृपा क्लिनिक’वर छापा टाकल्यानंतर संशयित उद्धव चव्हाण याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेली कोणतीही शैक्षणिक अर्हता किंवा पदवी नसल्याचे समोर आले. चव्हाण हा नागरिकांना ॲलोपॅथीचे उपचार देत असल्याचे आढळले. क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे आणि अन्न निरीक्षक अजित भुजबळ यांनी केलेल्या पाहणीत क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांचे शिक्के, औषध खरेदीच्या पावत्या आणि मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा आढळून आला.
या क्लिनिकमध्ये बायो-मेडिकल वेस्टची नोंदणी नसल्याचेही निदर्शनास आले. औषधांचा मोठा साठा मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) पुढील कारवाईसाठी सूचित करण्यात आले आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शंकर सुरेश पाटील पुढील तपास करत आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
