पुणे- अडचणीच्या वेळी मित्राला उसने दिलेले 600 रुपये परत मागितले, त्याने आईवरून शिवी दिली म्हणून संतापाच्या भरात मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केला. पुण्यातील चंदननगर परिसरात ही घटना घडली आहे.
या हल्ल्यात राहुल राजेंद्र जंवाजाळ (वय २२, रा. बोराटे वस्ती, चंदननगर) याचा जागीच मृत्यू झाला. चंदननगर पोलिसांनी आरोपी आशिष डेव्हिड मगर (वय २७, रा. येरवडा) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत राहुल आणि आरोपी आशिष हे एकमेकांचे चांगले मित्र होते. आरोपी आशिष हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने मित्रत्वाच्या नात्याने राहुलला 600 रुपये उसने दिले होते. उसने दिलेले पैसे आशिष याने राहुलकडे वारंवार मागितले. मात्र राहुल पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ करत होता. या कारणावरून वरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते.
८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चंदननगर भागातील बोराटे वस्ती परिसरात दोघे अचानक समोरासमोर आले. तिथे पुन्हा एकदा उसने दिलेल्या ६०० रुपयांचा विषय निघाला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हळूहळू या वादाचं रूपांतर जोरदार भांडणात झालं. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात राहुलने आशिषला थेट आईवरून अत्यंत घाणेरडी व अश्लील शिवीगाळ केली. आईवरून दिलेली शिवी ऐकताच आशिषने संतापाच्या भरात क्षणाचाही विचार न करता आपल्या खिशात लपवून ठेवलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि काही समजण्याच्या आतच त्याने राहुलवर एकापाठोपाठ एक सपासप वार करण्यास सुरुवात केली.
गंभीर वार झाल्याने राहुल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. भर रस्त्यात घडलेल्या प्रकाराने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट आणि पळापळ झाली. अतिरक्तस्राव झाल्यामुळे राहुलचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आशिष मगरला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे अधिक तपास करत आहेत.
