पुणे- पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीच्या व्यावसायिकाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि २५ लाख रुपये स्वीकारणाऱ्या चार आरोपींना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.
राहुल प्रेमनारायण मिश्रा (३८), अल्ताफ उस्मान जानवेकर (५३), रमेश भीमा मंजरेकर (३९) आणि सुनील राजेंद्र कानू (३५) अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मागील सहा महिन्यांपासून कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून कंपनीचे काम योग्य नसल्याचे सांगत, कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे सांगत तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास पाच कोटी रुपये द्या अशी मागणी केली होती. पैसे न दिल्यास कंपनीची वाट लावण्याची व जीवे मारण्याची धमकी आरोपींची दिली होती. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकारची गंभीर दाखल घेत नियोजनबद्ध कारवाई करून आरोपीना रंगेहाथ पकडले.
आरोपी सुनील कानू यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी या वाहनातून आरोपी फिर्यादीकडे आले होते. त्यानंतर खंडणीच्या रकमेबाबत चर्चा करण्यात आली. आरोपी राहुल मिश्रा याने फिर्यादी कडून 25 लाख रुपये रोख रक्कम काळ्या रंगाच्या बॅगसह स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. उद्योजक व व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी न पडता अशा घटनांची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग अवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, किशोर कांबळे ,प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव, प्रदीप गोडांबे, दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने केली.
