ब्रेकिंग न्यूज

पुण्यात गणेशोत्सव काळात प्रमुख मार्गांवर वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या, कोणत्या रस्त्यावर ‘नो एंट्री’

Share

पुणे- गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणारी गर्दी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर १२ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबरपर्यंत मध्यवर्ती भागातील १२ प्रमुख रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांना २४ तास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. या कालावधीत शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक, टिळक रस्त्यावर जेधे चौक ते टिळक चौक, कुमठेकर रस्त्यावर शनिपार ते टिळक चौक, लक्ष्मी रस्त्यावर संत कबीर चौक ते टिळक चौक आणि केळकर रस्त्यावर फुटका बुरुज ते टिळक चौक या मार्गांवर जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

बाजीराव रस्त्यावर स्वारगेट चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रस्त्यावर गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक आणि जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक या मार्गांचाही आदेशात समावेश करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते सावरकर चौक; तसेच गणेश रस्ता आणि मुदलियार रस्त्यावरील पॉवरहाउस, दारुवाला पूल, जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक या मार्गावरही जड-अवजड वाहनांना बंदी असेल.