ब्रेकिंग न्यूज

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्याची कारवाई करा अन्यथा… विद्यानंद बापट यांची शासकीय यंत्रणांना कायदेशीर नोटीस

Share

पुणे- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात ध्वनी, वायू व कचरा प्रदूषण रोखण्यासाठी आणि मंडपांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांच्या वतीने कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे व त्यांच्या टीमने कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. याबाबतची माहिती अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) प्रादेशिक अधिकारी यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

असीम सरोदे यांनी म्हणाले की, गणेशोत्सव दरम्यान या नोटीस बाबत कारवाई करावी नाही तर आम्ही गणेशोत्सव नंतर या यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करणार आहोत. नोटीस दिल्यानंतर तीन दिवसात उत्तर नाही दिले तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. सर्व सणामध्ये कोणीही असे वागू नये. पोलिसांना सगळे माहिती आहे. सामजिक प्रबोधन सर्व मार्गाने झाले पाहिजे. भावना दुखावणे म्हणणे आता थांबवले पाहिजे. राजकीय लोकांना यामुळे लोकप्रियता मिळते त्यामुळे त्याच्या पाठिंब्यामुळे अशा प्रवृत्तीना प्रोत्साहन दिले जाते. झुंडी समोर पोलीस यंत्रणा कमी पडते. धर्म आणि उत्सव राहिले पाहिजेत. ढोल ताशा बाबतही सामूहिक आवाज होतो त्यामुळे ते ही चालणार नाही असे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

नोटीसीतील प्रमुख मागण्या

१. अॅम्प्लीफायर, डीजे व लेझर शोवर बंदीः उत्सवादरम्यान उघड्या सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेच्या अॅम्प्लीफायर यंत्रणा, डीजे आणि लेझर शोच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात यावी.

२. न्यायालय व हरित nyaydhikaranachya आदेशांचे पालनः मा. मुंबई उच्च न्यायालय (डॉ. महेश बेडेकर याचिका) आणि मा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) ध्वनी प्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. ढोल-ताशा पथकांवर मर्यादा घालणे आणि रुग्णालये, न्यायालय व शाळांभोवती १०० मीटरचे ‘सायलेन्स झोन’ पाळणे बंधनकारक करावे.

३.मंडपांची पाहणी व वाहतूक नियंत्रणः मनपाने सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या गणपती मंडपांची तात्काळ पाहणी करावी. पादचाऱ्यांना, रुग्णवाहिकांना व अग्निशामक दलाच्या गाड्यांना अडथळा ठरणारे मंडपांचे स्थलांतर करावे, तसेच अतिक्रमण केलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी.

४.वातावरणातील हवा व घनकचरा प्रदूषण नियंत्रण: CO₂ कॉन्फेटी कॅनन फटाके आणि प्लास्टिक कचऱ्यावर बंदी आणून रिअल-टाइम डेसिबल डिस्प्ले ब लावावेत.