पुणे- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या योजनेतील भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्रासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार स्वत: हे केंद्र पुण्यात सुरू करणार आहे,’ पुढील पाच ते सहा महिन्यांत या प्रकल्पाला सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले.
या केंद्राबाबत आणि निधीबाबत विचारलेल्या प्रश्नावर सामंत म्हणाले, ‘केंद्र सरकारने अभिजात दर्जा दिलेल्या भाषांना किती निधी दिला, याचा आढावा घेतला आहे. संस्कृतसाठी रामटेक येथील कालिदास विद्यापीठाला निधी मिळाला आहे. मात्र, या निधीची वाट न पाहता पुण्यात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र उभारण्याचा निर्णय भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. या केंद्रासोबत मराठी विकास केंद्र जोडण्यात येणार आहे.’
निधीच्या घोषणांचा पाऊस
‘शंभराव्या साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपये, या संमेलनानिमित्त होणाऱ्या ९९ नांदी संमेलनांसाठी पाच कोटी, १३ विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाखांप्रमाणे चार कोटी, परदेशांतील १२ संमेलनांसाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) दोन कोटी, साहित्य परिषदेला एक कोटी याशिवाय पुस्तकांच्या दालनांसाठी आणि इतर उपक्रमांसाठी असा एकूण १८ कोटी रुपयांचा निधी मराठी भाषा विभाग देईल,’ अशा निधीच्या घोषणांचा पाऊस मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पाडला.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास शिवसेनेला फरक पडणार नाही
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे हे तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. ते आता राष्ट्रीय पातळीवर काम करीत आहेत. एकनाथ शिंदे काय करू शकतात, हे महाराष्ट्राने त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पाहिले आहे,त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास शिवसेनेला फरक पडणार नाही’
