ब्रेकिंग न्यूज

कोंढव्यात किरकोळ वादातून गोळीबार, सहा सराईत गुन्हेगारांना अटक

Share

पुणे- पुण्याच्या कोंढव्या भागात काही दिवसांपूर्वी किरकोळ वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी कारवाई करत ६ सराईत आरोपींना अटक केली.

जितेंद्र उर्फ दादू जालिंदर भालेराव, लक्ष्मण उर्फ सोनू उर्फ जांभ्या गजरमल, प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम, दिनेश रामदास घाडगे, कार्तिक महादेव पांडागळे आणि विजय रामदास चोंधे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुण्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. या धामधुमीतच ६ सप्टेंबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास मित्रासोबत झालेल्या वादातून तरुणावर गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. यामुळे या भागात दहशत निर्माण झाली होती. रात्री झालेल्या घटनेत जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. दादू भालेराव आणि त्याच्या ८ ते १० साथीदारांनी आरडाओरड करत या भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न टोळक्याने केला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरु असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपींबाबत गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. या तरुणांकडे बेकायदेशीर पिस्टल आले कुठून, हा हल्ला का करण्यात आला. ज्या तरुणावर हल्ला करण्यात आला, त्याची पार्श्वभूमी याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.