ब्रेकिंग न्यूज

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १६ ते २९ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू

Share

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १६ सप्टेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते २९ सप्टेंबर २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला असून या कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावास, मोर्चे, मिरवणूक आणि शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. गणेशोत्सव व अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विविध सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलन, उपोषण किंवा बंद पुकारले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मनाई आदेशाच्या काळात दाहक किंवा स्फोटक पदार्थ ज्वलनशील द्रवपदार्थ, दगड, काचेचे तुकडे काचेच्या बाटल्या किंवा इजा करता येईल अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रित येत येणार नाही. सभा घेणे, मिरवणूक काढणे आक्षेपार्ह भाषा वापरणे, सभ्यता आणि नीतिमत्तेला बाधा पोहोचणारे कृत्य करणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.