बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा  ट्रेलर प्रदर्शित

बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा  ट्रेलर प्रदर्शित
Share

‎‎दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या महाकाय चित्रपटाच्या पहिल्या भागाचा अधिकृत ट्रेलर नुकताच 30 जुलै रोजी पहाटे 4:15 वाजता, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर जगभरात प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून यावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

‎‎​दोन भागांमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे 4,000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत असून, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वाधिक खर्चिक प्रकल्प मानला जात आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीर कपूर (भगवान राम), साई पल्लवी (माता सीता) आणि साऊथ सुपरस्टार यश (रावण) यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय सनी देओल (हनुमान), रवी दुबे (लक्ष्मण) आणि अरुण गोविल (राजा दशरथ) हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण पात्रांमध्ये दिसणार आहेत.

‎‎​ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि हॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार हॅन्स झिमर या चित्रपटासाठी एकत्र येऊन पार्श्वसंगीत तयार करत आहेत. तसेच व्हिज्युअल इफेक्ट्सची  जबाबदारी ‘DNEG’ आणि ‘प्राइम फोकस स्टुडिओ’ सांभाळत आहे.

‎‎​नमित मल्होत्रा आणि यश यांच्या निर्मितीखाली बनणारा हा चित्रपट IMAX फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग नोव्हेंबर 2026 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर, तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Vedh News