बारामती- विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात आज सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर दोघांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करत होते.
पाटस मार्गावरून कुसेगाव, पडवी तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन एस. टी महामंडळाची बस सुप्याच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडेसातच्या सुमारास सुपे घाटातील पहिल्या वळणावर बस चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस दोन पलट्या घेत रस्त्याच्या बाजूला खाली गेली. या ठिकाणी रस्त्यालगत संरक्षक कठडा नसल्याने बस उलटली. बसने एक पलटी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी तातडीने बसमधून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.
घाटातील अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक जखमी विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार करत असून, सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर संवाद साधत जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी, याबाबत त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. रोहित पवार यांनी देखील ट्वीट करत, ‘प्रशासनाने तातडीने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि विद्यार्थीच काय एसटीने प्रवास करणाऱ्या कोणत्याही सामान्य माणसाचा जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसची नियमित तांत्रिक तपासणी केली जाते का, बसचे ब्रेक, टायर, इंजिन आणि अन्य यंत्रणा सुस्थितीत आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
