वडगाव मावळ- मावळ तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्राच्या उभारणीत त्यांनी अमूल्य योगदान देणारे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांना मंगळवारी (दि. १५) मावळवासीयांनी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या अंत्ययात्रेला राजकीय, कला, क्रीडा, उद्योग, सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
माजी मंत्री मदन बाफना (वय ८६) यांचे सोमवार, १४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली.
मंगळवारी सकाळी मदन बाफना यांचे पार्थिव बाणेर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उल्हास पवार आणि अंकुश काकडे यांनी अंत्यदर्शन घेऊन बाफना कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यानंतर सकाळी ११ वाजता वडगाव मावळ येथील संत तुकाराम प्रसारक मंडळाच्या हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी मावळ तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले.
दुपारी ४.३० वाजता वडगाव येथील स्मशानभूमीत मदन बाफना यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिसांनी मानवंदना देऊन माजी मंत्र्यांना अखेरचा शासकीय निरोप दिला.
अंत्यसंस्कारावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार देविदास भन्साळी,माजी आमदार विलास लांडे,बबनराव भेगडे, माऊली दाभाडे, बाळासाहेब नेवाळे,विठ्ठल शिंदे,रामदास काकडे,बापूसाहेब भेगडे, हभप बाळासाहेब काशीद,चंद्रकांत शेटे,बाबुराव वायकर,गणेश आप्पा ढोरे,गणेश खांडगे,यशवंत मोहोळ,दिलीप ढमाले, सुभाषराव जाधव,रवींद्र भेगडे,सुनील ढोरे, पंढरीनाथ ढोरे,दत्तात्रय पडवळ, आदींसह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी मदन बाफना यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीतील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्याने केवळ ज्येष्ठ राजकीय नेत्यालाच नव्हे, तर एक मार्गदर्शक, प्रेरणास्रोत आणि दीपस्तंभ गमावल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. मावळच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीय वाटचालीत त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
