ब्रेकिंग न्यूज

पुण्यात गणेशोत्सव काळात परवानगी शिवाय ड्रोन उडवाल तर पोलिसांकडून होणार कारवाई

Share

पुणे- गणेशोत्सवाच्या काळात परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून आता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यवर्ती पुण्यातील गर्दीच्या भागांत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे पोलिसांनी ‘अँटी ड्रोन पथक’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांत गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुका आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांना मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत अनेक व्लॉगर्स तसेच फोटोग्राफर्सकडून ड्रोन उडवून व्हिडिओ आणि रिल्स तयार करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेषतः मध्यवर्ती पुण्यातील गर्दीच्या भागात अनेक ड्रोन ऑपरेटर कार्यरत असल्याचे आढळून आले. विशेषतः मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणी अनेक ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याचे आढळून आले.

गणेशोत्सव काळात गर्दीचे व्यवस्थापन, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा तसेच ड्रोनमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक परवानगी न घेता चित्रीकरण करणाऱ्या ऑपरेटरवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, ड्रोनही जप्त केले जाणार आहेत. त्यामुळे केवळ सोशल मीडिया रिल्स, यूट्यूब व्हिडिओ किंवा गणेशोत्सवाचे चित्रीकरण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्लॉगर आणि फोटोग्राफरना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.