ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड शहरात १० ठिकाणी होणार कचरा प्रक्रिया केंद्र

Share

पिंपरी- मोशी कचरा डेपो येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने शहरातील विविध भागांतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रभागनिहाय विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. शहरातील वाढत्या कचऱ्याचा प्रश्न हाताळण्यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या पद्धतीत बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुषंगाने शहरातील विविध ठिकाणच्या १० आरक्षित जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

शहरातील कचऱ्याची प्रक्रिया एकाच ठिकाणी न करता प्रस्तावित जागांवर त्यांच्या क्षेत्रफळानुसार विविध प्रकारच्या घनकचरा प्रक्रिया सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, ऊर्जा निर्मिती, जैविक कचऱ्यापासून बायोगॅस व बायोफ्युएल निर्मिती तसेच प्लास्टिक कचऱ्यापासून विविध उत्पादने तयार करण्याच्या सुविधांचा समावेश असेल. या जागांची तांत्रिक योग्यता, उपलब्ध क्षेत्रफळ, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणीय बाबी आणि इतर आवश्यक निकषांची तपासणी सुरू आहे.

संबंधित सर्व बाबींचा अभ्यास करून तसेच सर्व जागांची तांत्रिक आणि पर्यावरणीय बाजू तपासून आवश्यक त्या संमती व मान्यता प्राप्त करून अंतिम जागा निश्चित करण्यात येणार आहेत. या विकेंद्रित व्यवस्थेमुळे कचऱ्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होण्यास, मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यास तसेच शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे.