ब्रेकिंग न्यूज

महामार्गावर अपघात किंवा गाडी बंद पडल्यास तात्काळ मिळणार ‘A I’ ची स्मार्ट मदत

Share

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, गाडी बंद पडली, किंवा वैद्यकीय मदतीची गरज भासली तर मदतीसाठी असलेली १०३३ हेल्पलाईन आता अधिक सक्षम होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हेल्पलाईनमध्ये आता कृत्रिम प्रज्ञा(ए आय ) रियाल टाइम लोकेशन ट्रॅकिंग आणि स्मार्ट इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. या प्रणालीमुळे तुम्हाला जागेवरच सर्व प्रकारची मदत तात्काळ मिळणार आहे.

२०१८ मध्ये सुरु झालेली हेल्पलाईन २४ तास कार्यरत असून, सुमारे १.४६ लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावर सेवा देत आहे. दररोज १५ हजार कॉल्स या हेल्पलाइनवर येत असतात. अपघात, वाहनातील बिघाड, रुग्णवाहिका, गस्तीपथक टोल तसेच फास्टटॅग संबंधी तक्रारी या माध्यमातून हाताळल्या जातात.

नव्या प्रणालीमुळे मदतीसाठी फोन करणाऱ्या वाहनचालकाचे अचूक लोकेशन तात्काळ निश्चित करता येऊ शकते. त्यानुसार आवश्कक ती मदत घटनास्थळी पाठवण्याची प्रक्रिया जलद होईल. विविध भारतीय भाषेतून या प्रणालीचा उपयोग करता येऊ शकतो. नेक्स्ट जनरेशन १०३३ प्रणाली विकसित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीतील इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड कडून तांत्रिक सूचना व प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. A I आणि मानवी हस्तक्षेपाची सांगड घालून महामार्गावरील आपत्कालीन मदत अधिक वेगाने करण्याचा प्रयत्न आहे.