पिंपरी – श्री संदीप वाघेरे युवा मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव २०२६ शनिवारी (दि. ५ ) पिंपरीगाव येथे मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चेंबूर येथील शितळादेवी गोविंदा पथकाने तब्बल सहा थर रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या सोहळ्याला परिसरातील हजारो नागरिक, तरुणाई आणि गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला. गोविंदांच्या घोषणांनी आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमास मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आयोजक संदीप वाघेरे, सुलभा उबाळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे, विकास साने, विराज लांडे, भीमाताई फुगे, निकिता कदम, प्रियांका कुदळे, मीनाताई नाणेकर, श्रीरंग शिंदे, ज्ञानोबा गव्हाणे, सुधाकरजी यादव, वसंत तावरे, रामभाऊ कुदळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दहीहंडी उत्सवासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री राशी खन्ना, महिमा मकवाना, नेहा सोनवणे आणि रुचिता जामदार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. अभिनेत्रींच्या उपस्थितीने तरुणाईमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्या आणि घोषणांनी दाद दिली. शितळादेवी गोविंदा पथकाने सहा थरांचा मानवी मनोरा उभारून दहीहंडी फोडताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी अपेक्षित असल्याने कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले. आयोजकांकडून कार्यक्रमादरम्यान आवश्यक शासकीय नियम व सुरक्षा सूचनांचे पालन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण उत्सव उत्साहपूर्ण तसेच शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
श्री संदीप वाघेरे युवा मंचाच्या वतीने आयोजित या दहीहंडी उत्सवाने पिंपरीगावातील सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सवाला एक वेगळीच रंगत आणली असून, हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने यंदाचा दहीहंडी सोहळा अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर अहिरराव तसेच नीतू भाटिया यांनी केले नियोजन युवा मंच अध्यक्ष हरीश वाघेरे, उमेश खंदारे, नितीन गव्हाणे, जितेंद्र वाटकर, किरण शिंदे, राघवेंद्र भांडगे, अक्षय नाणेकर, राजेंद्र वाघेरे, गणेश मंजाळ यांनी केले
