संविधानाच्या सन्मानासाठी सांगवीत आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन

पिंपरी- सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाचे प्रास्ताविका स्मारक कथितरीत्या विनापरवानगी हटवल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी (दि.२२) सकाळी ११ वाजल्यापासून संविधान चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, पुरोगामी सामाजिक संघटना आणि संविधान प्रेमी नागरिकांच्या सहभागाने हे आंदोलन होणार आहे.
या प्रकरणी भाजप नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे, त्यांचे पती संतोष कांबळे व इतरांवर कारवाईची मागणी होत आहे. मनपाच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी सदर कृती बेकायदेशीर असल्याचे पोलीस आयुक्तांना लेखी कळवूनही, आठवडा उलटला तरी ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला न बळी पडता निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाची पूर्वस्थितीत तात्काळ पुनर्स्थापना करावी, जबाबदार व्यक्तींवर निष्पक्ष चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावेत, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करावी, संविधानाच्या प्रतीकांचा व सार्वजनिक स्मारकांचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जोपर्यंत स्मारकाची पुनर्स्थापना होत नाही आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केला असून, नागरिकांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






