गाड्या धुण्यावरून चऱ्होलीतील सोसायटीत राडा; दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल

गाड्या धुण्यावरून चऱ्होलीतील सोसायटीत राडा; दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल
Share

पुणे- एकीकडे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात आहे तर दुसरीकडे गाड्या धुण्याच्या कारणावरून एका सोसायटीमध्ये तुफान राडा झाला. हा प्रकार चऱ्होली खुर्द येथील अभिमान श्री सोसायटीत घडला. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या तक्रारीमध्ये सोसायटीतील काही रहिवासी बोअरवेलच्या पाण्याच्या नळाला पाइप लावून गाड्या धुवत होते. सध्या पाणीटंचाई सुरू असल्याने सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नळाला पाइप लावून गाड्या धुण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन कमीत कमी पाण्यात गाड्या धुण्याचे आवाहन करण्यात आले होते. असे असतानाही पाइप लावून गाड्या का धुत आहात, असा जाब विचारल्याने वाद वाढला. त्यातून शिवीगाळ करून हाताने बादलीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी राहुल माधवराव शिंपाळे (वय ३३) यांच्या तक्रारीवरून सचिन कोठावडे (वय ४६), विवेक कोठावडे (वय १८), कुणाल कोठावडे (वय २०), आशिष भालेराव (वय २८) आणि गणेश धातपांडे (वय २२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या तक्रारीनुसार, सचिन मच्छिंद्र कोठावडे हे सोसायटीच्या पार्किंगमध्ये बादलीतील पाण्याने आपली रिक्षा धूत असताना निलेश चव्हाण, राहुल शिंपळे, रवींद्र बदाणे, विवेक पवार आणि प्रांजय भालेराव यांनी त्यांना तसेच त्यांच्या पत्नी व मुलांना हाताने आणि बादलीने मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
तसेच तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून पोलीस ठाण्याकडे निघालेल्या पत्नी आणि मुलाला अडवून सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले, शिवीगाळ केली आणि धमकी देत रोखून धरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून निलेश चव्हाण, राहुल शिंपळे, रविंद्र बदाणे, विवेक पवार आणि प्रांजय भालेराव यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vedh News