ब्रेकिंग न्यूज

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई 

Share

पिंपरी- अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गोठवली आहे. पोलिसांच्या प्रस्तावावर संबंधित प्राधिकरणाने २ सप्टेंबर रोजी आदेश कायम केला. 

पुणे जिल्ह्यात २०२६ मधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. सांगवी पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये दाखल झालेल्या अमली पदार्थ प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५५.२९ ग्राम मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मकोका कलम लावले होते.

पोलिसांच्या आरोपानुसार, या प्रकरणातील टोळीप्रमुख जुनैद अफजल खान आणि पत्नी फौजीया सुलेमान साटी खान यांच्या नावावर पुरंदर तालुक्यातील गराडे येथे गट क्र २२७४ मधील तीन गुंठे (३ हजार चौ.फूट) जमीन आणि त्यावरील बांधकाम, अशी सुमारे ५५ लाख १६ हजार रुपये किमतीची मालमत्ता असल्याचे समोर आले. ही मालमत्ता अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ यांनी उपलब्ध पुराव्यांसह सक्षम प्राधिकारी, मुंबई यांच्याकडे मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव सादर केला. सुनावणीदरम्यान संबंधितांनी ही मालमत्ता कायदेशीर उत्पन्नातून मिळवल्याचा ठोस पुरावा सादर केला नाही. त्यामुळे २ सप्टेंबर २०२६ रोजी सक्षम प्राधिकरणाने सदर मालमत्ता अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मिळविल्याचे मान्य करत गोठवण्याचा आदेश कायम केला.

सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरण किंवा कोणताही व्यवहार करता येणार नाही. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ सचिन कदम यांनी केली.