राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी दोघांना अटक, हल्ल्यासाठी २ लाख रुपये दिल्याचे निष्पन्न

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी दोघांना अटक, हल्ल्यासाठी २ लाख रुपये दिल्याचे निष्पन्न
Share

बारामती – उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या हल्ल्यासाठी २ लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पुणे शहर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला देखील ताब्यात घेतले आहे.

पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, सध्या रा. भिगवण, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पालखी मार्गावर पायलट ढाब्यासमोर उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र हल्ला केला होता. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पुणे शहर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पार्थ अवथळे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ज्ञानदेव शिंदे याने हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे यांना २० ऑक्टोबर रोजी अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.

Vedh News