व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादातून तळेगावात दुकानात घुसून युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

व्हॉट्सॲप स्टेटसच्या वादातून तळेगावात दुकानात घुसून युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
Share

तळेगाव दाभाडे- व्हॉट्सॲप स्टेटसच्या जुन्या वादाचा राग मनात धरून एका कापड दुकानात खरेदीच्या बहाण्याने येऊन तिघांनी एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात घडली. गंभीर जखमी झालेल्या युवकावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी देवेंळ किशन जाधव (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंळ जाधव हे शिवाजी चौकातील ‘आफ्टर लुक’ या कापड दुकानात काम करत असताना तिघे आरोपी तिथे आले. त्यातील एकाने जीन्स पॅन्ट घेण्याचे सांगून फिर्यादीचे लक्ष विचलित केले. फिर्यादी मागे वळताच आरोपीने जवळ असलेल्या कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व मानेवर सपासप वार केले. फिर्यादी दुकानाबाहेर पळत असताना इतर दोघांनी ‘याला जिवंत सोडू नका’ असे चिथावणी देत पुन्हा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

फिर्यादीच्या नातेवाईक व मित्राने एका खुनाच्या गुन्ह्यातून सुटल्यानंतर व्हॉट्सॲपवर ‘किंग इज बॅक’ असे स्टेटस ठेवले होते. या स्टेटसचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Vedh News