पुणे – मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून चाचण्या घेण्यात येत आहेत.
सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटाला मेट्रो सेवा सुरू आहे. पण, प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता मेट्रो सेवेचा कालावधी आणखी कमी करण्याचे नियोजन महामेट्रोकडून सुरू आहे. त्यानुसार महामेट्रोने गणेशोत्सापासून गर्दीच्या वेळेस दर पाच मिनिटाला सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तर विना गर्दीच्या वेळी दर १० मिनिटाला मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू असणार आहे.
महामेट्रोकडे तीन डब्यांचे एकूण ३३ रेक आहेत. त्यापैकी सध्या ३० रेकचा नियमित वापर केला जात आहे. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो चालविण्यासाठी सर्व ३३ रेक सेवेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वनाझ-रामवाडी मार्गावर १७, तर पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावर १६ रेकचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत फेऱ्यांची संख्या वाढविता येणार आहे.पाच मिनिटांच्या वारंवारितेने मेट्रो चालविण्याच्या चाचण्या गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी होत असून, गणेशोत्सवापासून प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोची तयारी सुरू आहे.
