माहेरहून गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी ; छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन

पुणे- माहेरहून गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी करुन सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पती, सासु, दिराला अटक केली आहे.
हिना असिफ पटेल (वय २१) आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिची आई शमीम मुसा शेख (वय ४०, रा. बालेवाडी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती आसिफ मशाक पटेल (वय २५), सासु साहेराबेगम मशाक पटेल (वय ४२), दीर सिदीप मशाक पटेल (वय २३, तिघे रा. सिद्धीविनायक डेव्हलपर्स, बागवान वस्ती, भरतवाडी, पिंपरीसांडस) यांना अटक केली आहे. ही घटना सिद्धीविनायक डेव्हलपर्स, भरतवाडी, पिंपरी सांडस येथे १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी हिना हिचा विवाह आसिफ पटेल याच्याबरोबर ३० मे २०२४ रोजी धाराशिव येथे करण्यात आले. लग्नानंतर काही महिने व्यवस्थित गेले. त्यानंतर आसिफ हिना हिला तिच्या आईवडिलांशी फोनवरही बोलू देत नव्हता. पती, सासु, दीर आणि नणंद साबिया फिरोज शेख तिच्यासोबत भांडण करत असत. आसिफ याने मला नवीन गाडी घ्यायची आहे, तुझ्या घरच्याकडून पैसे घेऊन ये, असे बोलून तिला शिवीगाळ करुन मारहाण करत असे. त्यांनी आसिफ याला समजावुन सांगितले होते. तरीही ते तिला जेवण करायला देत नसत. त्यांनी व्याजाने पैसे घेऊन आसिफ याला दिले होते.
परंतु, त्यांची नवीन गाडीची मागणी सुरुच होती. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी हिना हिने फोन करुन रडत मला खूप त्रास होत आहे, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर दुपारी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून नंणदेवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे तपास करीत आहेत.






