येरवडा ड्रेनेज दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेची कंत्राटदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई
पुणे – येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे. कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्याला काळ्या यादीत टाकण्यासह त्याच्याकडे सुरू असलेली सर्व कामे काढून घेण्यात येणार आहेत. तसेच, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
घटनास्थळी खड्ड्याभोवती करण्यात आलेले बॅरिकेडिंग मजबूत नव्हते. तेथे फायबरचे बॅरिकेडिंग लावण्यात आले होते. त्यामुळे अपघाताच्या वेळी ते पुरेशी सुरक्षा देऊ शकले नाही. संबंधित कंत्राटदाराचे काम निर्धारित उद्दिष्टानुसार वेगाने सुरू होते; मात्र, सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये झालेली चूक गंभीर आहे. मजबूत बॅरिकेडिंग केले असते, तर ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचू शकला असता, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
संबंधित कंत्राटदाराकडे शहरात किती कामे सुरू आहेत, याची माहिती संकलित केली जात आहे. शहरात ड्रेनेज आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या जातील. चौकशीत समोर येणाऱ्या त्रुटींच्या आधारे नवी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येईल, असे राम यांनी सांगितले.
अपघातानंतर ज्येष्ठ नागरिकाला राजीव गांधी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना कोणत्या परिस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आणि त्याच रात्री त्यांचा मृत्यू कसा झाला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. अपघातात वाहनचालकाची किंवा मृत व्यक्तीची काही चूक होती का, याचा तपास पोलिस करतील. मात्र, ड्रेनेजच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
अशी घडली घटना
येरवडा येथील मच्छी मार्केट परिसरात ड्रेनेज लाईनचे काम सुरु असताना त्या ठिकाणाहून रस्त्यावरून ५५ वर्षीय प्रदीप परदेशी पायी निघालेले असताना त्यांना समोरून आलेल्या रिक्षाचा धक्का बसला. तोल गेल्यामुळे ते थेट ड्रेनेजसाठी खोदलेल्या १० ते १५ फूट खोल खड्ड्यात पडले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने उपचार दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर मृत प्रदीप परदेशी यांच्या नातेवाइकांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेला जबाबदार कोण, तसेच कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नव्हत्या, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा सुमारे १० ते १५ फूट खोल होता. खड्ड्याभोवती सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप नागरिकांनी केला.
