सासूचा खून करून नाव वेश बदलून २६ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे – पोलिसांपासून वाचण्यासाठी नाव बदलले… वेशांतर केले.. ओळख बदलली.. पण पोलिसांनी त्याला पकडलेच. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. चाकण तालुक्यात एका जावई आपल्या सासूची हत्या करून २६ वर्षे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला. पण शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.
निवृत्ती दौलत जाधव (रा. सोळबंद आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) असं या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै २००० रोजी सोळबंद आंबेठाण येथे जाधव याने घरगुती वादातून आपल्या सासूबाई लक्ष्मीबाई वाघमारे यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. परंतु त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
दरम्यानच्या काळात आरोपीने आपले नाव, ओळख आणि वेश बदलल्यामुळे गेली 26 वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, अखेर पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध घेतला. तब्बल २६ वर्षांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पवनानगर परिसरातील आंबेगाव येथून अटक केली.
गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काहीतरी चूक करतोच. तीच चूक त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवते.






