पुणे- भरधाव ट्रकने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर ट्रक आणि टेम्पो दोन्ही वाहने विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये शिरले. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या कारला या वाहनांची धडक बसली. या भीषण अपघातात दोन जण रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्युमुखी पडले तर अन्य १२ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बेंगळुरू महामार्गावर जांभूळवाडी दरी पुलाजवळ लक्ष्मी लॉजसमोर रविवारी (दि. १३) रात्री १० च्या सुमारास झाला.
हृदयनाथ मोहन गायकवाड ( वय ४७ रा. मेघवाडी पोलीस ठाण्याजवळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई) यांचा आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय ५० रा. सेक्टर १०, नेरूळ, नवी मुंबई) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने अशोक लेलँड ट्रक (एमएच ०९ सीयू ७८२८) येत होता. जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ चालक प्रमोद विठ्ठल वाघ (वय ४०, रा. खटाव, जि. सातारा) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकने पुढे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो ट्रकला (एमएच ११ सीएच ९००७) पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडकेनंतर आयशर टेम्पो आणि अशोक लेलँड ट्रक लेन सोडून मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या बाजूच्या लेनमध्ये गेले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या मारुती सुझुकी एर्टिगा (एमएच ०३ ईआर ८४३२) आणि टाटा अल्ट्रोज (एमएच ४३ सीएम ३७५९) या वाहनांवर दोन्ही वाहने आदळली. या चार वाहनांच्या धडकेत आयशर टेम्पो, एर्टिगा आणि अल्ट्रोज या तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
अपघातात चारही वाहनांतील चालक आणि प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना हृदयनाथ मोहन गायकवाड यांचा आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर यांचा मृत्यू झाला. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालक प्रमोद वाघ तसेच ट्रकचे मालक संदीप गोरख सूर्यवंशी (वय ४५, रा. खटाव, जि. सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
