मुंबई- एसटी बस प्रवास तिकिटात सवलत मिळणाऱ्या एनसीएमसी कार्डच्या नोंदणी आणि वितरण प्रक्रियेत राज्य शासनाने मोठा बदल केला आहे. आता बायोमेट्री करताना बोटांचा ठसा उमटत नसेल तर आधार ‘ओटीपी’चा पर्याय खुला करण्यात आला आहे. तसेच कार्ड हरवल्यास नवे कार्ड मिळवण्याबाबतचाही पर्याय खुला केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी राज्यातील महिलांसाठी एसटी प्रवासावर ५० टक्के सवलत तसेच ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना एसटी प्रवास मोफत केला होता. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी राज्य सरकारने NCMC कार्ड अनिवार्य केले आहे. सध्या या कार्डची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत जास्त सुलभता यावी म्हणून त्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. राज्य शासनाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे.
ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून आधारकार्ड संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त OTPच्या आधारे NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून हरवलेले अथवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून १९९ रुपये शुल्क भरून नव्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
QR कोड पावतीद्वारे सवलतीचे तिकीट
१६ सप्टेंबरपासून NCMC कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना QR कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित सवलतधारकाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी ३० दिवसांच्या आत NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे. त्यामुळे सवलतीचा प्रवास अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित लाभार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
