ब्रेकिंग न्यूज

३८ वा पुणे फेस्टिव्हल ; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव पुरस्कार’

Share

पुणे – ३८ व्या पुणे फेस्टिव्हलतर्फे यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्काराने’ ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाचा यावेळी सन्मान करण्यात आला.

३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी स्वारगेट येथील श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच पुणे फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पुणे फेस्टिव्हलच्या संरक्षक अभिनेत्री व नृत्यांगना खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.

यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्काराने’ ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाचा यावेळी सन्मान करण्यात आला. याशिवाय ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांनाही पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यंदाचा पुणे फेस्टिव्हल संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी नऊ मिनिटांची विशेष चित्रफीत यावेळी प्रदर्शित करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या रणमर्द शिवाजी मंडळ आणि श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान यांचाही या सोहळ्यात विशेष गौरव करण्यात आला.