ब्रेकिंग न्यूज

पुण्यात आरटीओ चौकात ट्रकची दुचाकीला धडक, एकाच मृत्यू, तिघे जखमी

Share

पुणे – आरटीओ चौकात गुरुवारी पहाटे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर पाच वर्षांच्या मुलासह तिघे जण गंभीर जखमी झाले.

या अपघातात गुलाब रामजी गावित (वय ३४, रा. चापापाडा, जि. नाशिक) यांचा मृत्यू झाला. तर सुभाष रामजी गावित (वय ३२), अनिता सुभाष गावित (वय २८) आणि यश सुभाष गावित (वय ५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब गावित हे त्यांचा भाऊ सुभाष, वहिनी अनिता आणि पुतण्या यश यांच्यासह गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास प्रादेशिक परिवहन कार्यालय चौकातून (आरटीओ चौक) जात होते. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच गुलाब गावित यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

याबाबत सुभाष गावित यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखडे करत आहेत.