पिंपरी- पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारी असलेले सार्वजनिक शौचालय मागील दोन वर्षांपासून बंद आहे. स्थानिक नागरिकांनी तोंडावर हात ठेवून प्रशासनाच्या विरोधात मूक निषेध नोंदवला. दोन दिवसात शौचालय सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
या प्रश्नाची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित ठेकेदार सुबोध ठाकूर यांना जाब विचारला. दोन वर्षांपासून शौचालय बंद असून, कधी पाणी तर कधी विजेचे कारण दिले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. शौचालय परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, सार्वजनिक सुविधेची दुरवस्था झाली आहे. शौचालयाच्या इमारतीतील गाळ्यांचा अनधिकृत वापर होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. ई-सेवा केंद्रासाठी असलेल्या गाळ्यात पंक्चर काढण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.
भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका अनिता संदीप काटे यांच्या सहकार्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन कुंदा भिसे यांनी यावेळी नागरिकांना दिले.
