पुणे – एका पाठोपाठ एक अपघातांची मालिका देणारा नवले पूल पुन्हा एकदा भीषण अपघाताने थरारला आहे. भूमकर पुलावर शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे तो भरधाव वेगात समोरील ट्रकला जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की मागोमाग तीन ट्रक एकमेकांवर आदळले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर ३ ते ४ जण जखमी झाले आहेत.
अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की ट्रकच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण धडकेत एक व्यक्ती ट्रकच्या कॅबिनमध्येच आत अडकून पडली होती. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाकड पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाती वाहने बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले.
