पिंपरी- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान चिंचवड येथील ‘नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. प्रशासकीय व शासन व्यवस्थेची विद्यार्थ्यांना जवळून ओळख व्हावी, तसेच त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे मिळावीत, या उद्देशाने नोव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष तथा आमदार अमित गोरखे यांच्या वतीने विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, आमदार विक्रांत पाटील, उपमहापौर शर्मिला बाबर, अनुप मोरे, समीर जेऊरकर, डॉ. प्रिया गोरखे, प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्न मंत्र्यांना विचारले. एका विद्यार्थ्याने जन्म दाखला, रहिवासी दाखला आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी कमी करण्याची मागणी केली. तर एका विद्यार्थिनीने रेशन कार्ड डिजिटल करून ते मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
या प्रश्नांचे उत्तर देताना बावनकुळे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. शासनाच्या आयटी विभागामार्फत डेटा सेंटर आणि डिजिटल प्रणालीचा वापर वाढविण्याचे काम सुरू असून, रेशन कार्ड मोबाईलवर उपलब्ध करून देण्याच्या सूचनेवर शासन आधीच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
