ब्रेकिंग न्यूज

मुंबई पोलिसांनी पुण्यातील व्यावसायिकाच्या ‘अफेअर’चा केला भांडाफोड 

Share

मुंबई – पुण्यातील एका बिझनेसमनने आपले ‘अफेअर’ लपवण्याची केलेली धडपड अखेर मुंबई पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे उघडी पडली. मैत्रिणीच्या एका चुकीने त्याची बायकोसमोर पोलखोल झाली. 

याबाबतची हकीकत अशी की, पुण्यातील एका बिझनेसमनने आपण बिझनेस टूरवर परदेशी क्वालालंपूरला जातो असे सांगून प्रत्यक्षात बिजनेस टूरवर न जाता आपल्या मैत्रिणीबरोबर मुंबईच्या आंतरराष्ट्रीय सहार विमानतळावर पोहोचला. या ठिकाणी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना या बिझनेसमनच्या मैत्रिणीने जो पासपोर्ट दाखवला तो पूर्वी हरवल्याची तक्रार तिने या पूर्वी दिलेली होती.

बिजनेसमनची मैत्री जुना पासपोर्ट घेऊन प्रवास करत होती, जो हरवल्याची तक्रार तिने आधी केली होती. इमिग्रेशनने जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आणला तेव्हा बिजनेसमन घाबरला. सर्व प्रकरण सहार पोलिसांकडे आले. पत्नीसमोर आपले बिंग फुटेल या भीतीने त्याने खोटी कहाणी रचली.

सहार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. ४६ वर्षांचा हा बिझनेसमन पुण्यात लॉन्ड्रीचा मोठा बिझनेस करतो. एयरपोर्टवर चेकिंगच्या वेळी मैत्रिण अडकली तेव्हा लगेचच त्याने आपली ट्रिप कॅन्सल केली, यानंतर त्याने स्वत:चा मोबाईल स्विच ऑफ केला आणि एयरपोर्टवरच्या लँडलाईनवरून पत्नीला फोन केला. इमिग्रेशनच्या अडचणींमुळे मला मोबाईल जमा करावा लागत आहे, असं त्याने पत्नीला सांगितलं. मग तो गर्लफ्रेंडसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेला.

दुसऱ्या दिवशीही बिजनेसमन पत्नीसोबत खूप कमी बोलला, त्याने इमिग्रेशनची खोटी कहाणी तिला पुन्हा एकदा सांगितली. यानंतर त्याचा फोन पूर्णपणे बंद झाला. बराच वेळ पतीसोबत संपर्क होत नसल्यामुळे पत्नी घाबरली आणि बुधवारी तिने पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पतीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा प्रकरणाचा तपास करायला सुरूवात केली, तेव्हा सगळे सत्य समोर आले. आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी पतीने ही कहाणी रचल्याचे पोलिसांनी सांगितले.