मुंबई- गणेशोत्सवाच्या काळामध्ये ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून सर्वसामान्य भाविकांपर्यंत सर्वांचीच गर्दी असते. मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. याच रांगेत संरक्षणासाठी उभ्या राहिलेल्या पुण्यातील २५ वर्षीय भाविकाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
जयदीप मेघराज नेमाडे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो मूळचा जळगाव येथील आहे.
जयदीप हा जळगावच्या नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे यांचा एकुलता एक मुलगा होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंग व एमबीएनंतर तो पुण्यात नोकरी करत होता. दरवर्षीप्रमाणे तो मित्रांसोबत ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी मुंबईला गेला असताना 17 सप्टेंबर रोजी रात्री दर्शन रांगेत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जयदीप मित्रांना सांगून रांगेतून बाहेर पडला. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला तातडीने मदत कक्षात नेऊन नंतर रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जयदीपच्या आईचे १२ वर्षांपूर्वीच निधन झाले असून, या घटनेने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह जळगाव येथे रवाना करण्यात आला. आज सकाळी वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.
या घटनेमुळे लालबागचा राजा मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील काही वर्षांपासून व्हीआयपी दर्शन व्यवस्था आणि स्वयंसेवकांकडून भक्तांशी होणारे कथित गैरवर्तनासारख्या बातम्यामुळे सातत्याने चर्चेत राहिलं आहे. स्वयंसेवकांकडून महिला भक्तांशी असभ्य वर्तन, धक्काबुक्की आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची यंदा महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली. १० सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत आयोगाने पोलीस प्रशासन आणि संबंधित पक्षांना कठोर शब्दांमध्ये यासंदर्भात ताकीद दिली. सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी गणेशोत्सवानंतर ६ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
