ब्रेकिंग न्यूज

ढासळणाऱ्या पायाभूत सुविधा आणि अभियंत्यांची प्रतिमा !

Share

आज १५ सप्टेंबर भारतातील अत्यंत हुशार, कर्तृत्ववान देशनिष्ठा प्रेरित सेवाभावी अभियंता डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा आज जन्मदिन. हा दिवस दरवर्षी अभियंता दिवस अर्थात ‘इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. वयाच्या ९२ यावर्षी गंगा नदीवर पूल उभारण्यासाठी, भर उन्हामध्ये सर्वेक्षण करत फिरणारा तो महान अभियंता होता.

निवृत्तीनंतरही देशासाठी हे गृहस्थ थेट बांधकाम स्थळी जाऊन कधी कधी बोगीत राहून ,गंगा नदी प्रकल्प आखणीचे काम करत असत. देशातील महत्त्वाच्या प्रकल्प उभारणीमध्ये त्यांचे योगदान आहे. म्हैसूर संस्थांचे ते मुख्य अभियंता असताना उत्कृष्ट राजकीय प्रशासक याची भूमिका बजावून विशेषता मैसूर संस्था घडवण्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. आदर्श व कार्यक्षम अभियंता म्हणून त्यांची जगभर ओळख होती. जागतिकीकरणामुळे आज विकास वाढतोय आणि विकासामध्ये अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे असते. मानवी विकासासाठी अभियंत्याचा बौद्धिक कौशल्य ही महत्त्वाचे असल्याने अभियांत्रिकी काळानुरूप बऱ्याच नवीन शाखा सुरू झाल्या. त्यावर संशोधन होत राहिले.

उत्पादन, देखभाल, निर्मिती या क्षेत्रामध्ये अभियंत्यांची मागणी वाढत आहे. या संकल्पनेतून चांगल्या कामाचे उभारणी अपेक्षित असताना आज देशातील अभियांत्रिकी निर्मित विशेषता सरकारी सेवा सुविधा यांचा बट्ट्याबोळ झालेला दिसतो. रस्ते खचतआहेत, रेल्वे पूल कमकुवत होत आहेत, अनेक रस्त्यांना चिरा पडत आहेत, बांधकामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे दिसत आहेत. मागील दहा-बारा वर्षांमध्ये देशाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. सातत्याने त्याच्यामध्ये त्रुटीही दिसून येत असल्याने कोट्यवधी रुपयाचे आर्थिक नुकसान होत आहे. जलद पायाभूत सुविधा निर्मित करताना अनेक त्रुटी निदर्शनास येतात.

रोज असे प्रकार आढळून येत असल्यामुळे त्यामध्ये गांभीर्य जाणवत नाही व अधिकारी सहित राजकीय जबाबदार व्यक्तींची यामध्ये सहिष्णुता संपत आलेली आहे. टिकाऊ व दर्जेदार पायाभूत सुविधा निर्मित करण्याची कोणामध्येही मानसिकता राहिलेली नाही. आगामी येणाऱ्या दहा वर्षांमध्ये रस्ते पूल सार्वजनिक सेवा सुविधा याचा बोजवारा उडाल्याशिवाय राहणार नाही. या सर्व प्रकाराला केवळ अभियंत्याला जबाबदार धरले जाते पण एकंदरीत या क्षेत्रामध्ये वाढत चाललेला भ्रष्टाचार, त्याचबरोबर भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर राजकीय व सामाजिक काम करणाऱ्या लोकांची संख्या ही वाढत चालत आहे .

पायाभूत सुविधा म्हणजे भ्रष्टाचाराचे मुख्य साधन मानले जाते शिवाय झटकेपट पैसा यातून मिळाला जातो. बऱ्याचदा राजसत्ता प्रेरित ठेकेदार कमी दरामध्ये निविदा भरतात कोणत्याही ठेकेदाराला पैशाचे वाटप करावे लागते. याची वाचता बऱ्याचदा लोकांनी मेळावे व अधिवेशन घेऊन सुद्धा केलेली आहे.. राजरोसपणे कोणाला किती टक्केवारी द्यावी लागते. याची खुलेआम वाच्यता करून सुद्धा व्यवस्था सुधारत नाही.

या भ्रष्टाचारामुळे कामावर वापरण्यात येणारे साहित्य त्याचबरोबर बांधकामास लागणारे इतर बाबी कमी दर्जाच्या वापरल्या जातात .यामध्येच त्यांचा थोडेफार पैसे वाचवण्याचा प्रयत्न असतो. अभियंता बऱ्याचदा दबावाखाली काम करत आहेत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विकासकामात भ्रष्टाचार केला जातो यातून बेकायदेशीर व खराब कामाची निर्मिती करण्यात येते. मग “अभयंत्यालाच बदनामीला सामोरे जावे लागते.

एकंदरीत भारतीय नागरिकाला विकसित झालेल्या पायाभूत सुविधांचा उपभोग येथून पुढे करता येईल असे वाटत नाही. कारण की करोडो रुपये या सुविधावर खर्च केले जातात पण गुणवत्तेच्या प्रमाणापेक्षा दिखावेकडे सर्वांचं लक्ष लागतं घाई गडबडीने मोठ मोठे प्रकल्प यांचे उद्घाटन केले जाते व काही दिवसातच त्याला घरघर लागते अनेक उदाहरणे आपल्याकडेपाहायला मिळतात.

दिल्ली डेहरादून आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे यावर भेगा पडणे /जमीन खसणे /खड्डे पडणे/ असे प्रकार झालेले आहेत. तीन मे रोजी भागलपुर जवळ पुलाचा स्लॅब तुटून लांब पुलाचे दोन तुकडे झाले. बोर घाटामध्ये काही रेल्वे लाईन वाहून गेली. त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या. एकंदरीत पायाभूत सुविधा कोसळण्याचा हा कालावधी दिसून येतो जनतेस पायाभूत सुविधांचा उपभोग त्याचबरोबर वेळेवर पोहोचण्याची अर्थात सर्व सेवा सुविधा मिळण्याची शाश्वती सध्या राहिलेली नाही. विकासाचे केवळ गोडवे गाऊन प्रगती अशक्य आहे. केवळ अभियंत्याला जबाबदार न धरता गुणवत्तेला आणि दिखाऊ कामापेक्षा टिकाऊ पणाला जास्त महत्त्व देणे हे गरजेचे वाटते. अशा अत्यावश्यक व पायाभूत सुविधा मधील भ्रष्टाचार संपल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही.

डॉ. डी.एस.काटे
(स्थापत्य अभियंता व उद्योजक)