पुणे -पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात ऋषीपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण करून स्त्रीशक्तीचा जागर केला. ‘ॐ नमस्ते गणपतये’, ‘मोरया मोरया’ आणि ‘ॐ गं गणपतये नमः’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षातील गणेशोत्सवानिमित्त या अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे यंदाचे ४१ वे वर्ष होते. उत्सव मंडपासमोर उभारण्यात आलेल्या प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीसमोर हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच परिसरात येण्यास सुरुवात केली होती. मुंबई, सातारा, कोल्हापूर, लातूर यांसह विविध शहरांतून महिला या उपक्रमासाठी पुण्यात दाखल झाल्या होत्या. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून नाना वाड्यापर्यंत महिलांची गर्दी पाहायला मिळाली. भल्या पहाटे झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या शंखनादाने झाली. त्यानंतर ओंकार जपाने वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. ‘गणराजा गणनायका…’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे…’ या गणेशगीतांच्या सादरीकरणानंतर हजारो महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. एकाच वेळी हजारो महिलांच्या मुखातून अथर्वशीर्षाचे मंत्रोच्चार ऐकू येत असल्याने परिसर भक्तीमय झाला होता.
यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, सचिन आखाडे आदी उपस्थित होते.
