केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये एका दुचाकीस्वाराने शिरण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (१३ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडला.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शुभम विजय वनित (वय ३२, रा. नाना पेठ ) असे या दुचाकीस्वाराने नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१३ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास पोलीस कर्मचारी ईश्वर लक्ष्मण भिकुले हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर होते. मोहोळ यांचा वाहनांचा ताफा चौकातून जात असताना शुभम वनित याने दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवत ताफ्याला ओव्हरटेक केल्याचा आरोप आहे.
दुचाकी चालविण्याच्या पद्धतीमुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
