ब्रेकिंग न्यूज

बारामती : विवाहितेच्या हत्येप्रकरणी २६ वर्षीय तरुणाला अटक, चोरीसाठी शिरला आणि विवाहितेला संपवले 

Share

बारामत – बेडरूममध्ये शिरून विवाहितेचा निर्घृण खून केल्या प्रकरणी बारामती पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. वैशाली तानाजी पवार (वय ३०) असे मृत महिलेचं नाव आहे. याबाबत तिची सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर शनिवारी रोजी सायंकाळी बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी परिसरात वैशाली यांचे पती तानाजी हे रडत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी त्याच्या आईला दिली. त्यानंतर रंजना पवार यांनी घरी जाऊन पाहिलं असता वैशाली खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी आणि परिसरातील चौकशीतून पोलिसांना गणेश माने याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

शवविच्छेदन अहवालात मृत महिला गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं असून, महिलेवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिला हातोड्याने मारहाण केली. त्यानंतर अत्याचार करून टॉवेलने गळा आवळून तिचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं. शवविच्छेदनात महिलेच्या डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या. तसेच तिच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व पैंजण आरोपीने नेल्याचं निष्पन्न झाले. आरोपीकडून हातोडा, कपडे व दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.