ब्रेकिंग न्यूज

एआयचा फुगा आज ना उद्या फुटणार – डॉ अच्युत गोडबोले

Share

पुणे(प्रतिनिधी) कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय ) सर्व कामे सहज,अचूक आणि त्वरित होतात. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे खूप जलद गतीने क्रांती घडत आहे त्यामुळे सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे .कोट्यावधी नागरिक बेरोजगार होणार आहे, त्यांच्या हातातील आत्ताची कामे जवळपास नाहीशी होणार आहेत. जरी हा ए आयचा फुगा आज ना उद्या फुटणार असला, तरी त्याचे सर्वगामी परिणाम संपूर्ण समाजावरती होत आहेत.यासाठी एआयचे फायदे तोटे समजून घेत, जगाचा अभ्यास करून सातत्याने स्वतःला कायम काळाशी सुसंगत (अपडेट) ठेवले पाहिजे.

याची भिती बाळगण्यापेक्षा एआयला मित्र बनवून सामोरे जा.येणाऱ्या काळात नोकरीचे प्रमाण झपाट्याने कमी होणार आहे, त्यामुळे उद्योजक होणे हे याच्यावरचं एक उत्तर असू शकतं. आपण धोरणत्मक नियोजन करून एआयला अनुरूप असे उद्योग सुरू केले पाहिजेत. असे मत लेखक डॉ अच्युत गोडबोले यांनी काढले.
आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलच्या वतीने जेआरडी टाटा यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात आलेल्या उद्योजकता दिनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.यावेळी आंत्रप्रेन्यूअर्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष अमोल जाधव, सचिव सुभाष माईणकर,
खजिनदार सुनील थोरात, समन्वयक अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोडबोले पुढे म्हणाले की,एआय संपूर्ण गाणं तयार करून देतो, यामुळे गाण्याच्या निर्मितीशी संबंधित सर्वांच्या हाताला काम राहणार नाही. त्यासोबतच डार्क फॅक्टरीमध्ये रोबोट संपूर्ण फॅक्टरी 24 तास चालवतो, वस्त्र निर्मिती, खाद्यान्न, वस्तू डिलिव्हरी,औषधनिर्मिती, ड्रायव्हिंग अशा बऱ्याच क्षेत्रात शिरकाव झाला, मात्र काही क्षेत्राला अजून मानवाशिवाय पर्याय नाही.

आज ए आयचा बऱयाच क्षेत्रावर दुष्परिणाम होत असल्याने एआयचा जनक जेफरी हिल्टन आणि हरारी हे देखील एआयवर निर्बंध घातले पाहिजेत अशी मागणी करीत आहे.आपल्याकडे डेटा सेंटर आले म्हणजे प्रगती समजतात, पण डेटा सेंटर गार ठेवण्यासाठी मुबलक पाणी लागते,आणि त्याला मेगावॅट स्केल मध्ये ऊर्जा लागते.