ब्रेकिंग न्यूज

…..तर मी राजकारणातून निवृत्त होईन ; राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असे का म्हणाले ? व्हिडिओ पाहा

Share

मुंबई- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांना दणका दिला होता. आंबेगाव तालुक्यात एका नामांकित कंपनीत एफडीएच्या धाडीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे समोर आले होते. या कारवाईनंतर आंबेगावचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेसळखोरांना पाठिशी घातल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून केला जात आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांपासून FDA मार्फत सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही विघ्नसंतोषी राजकीय विरोधकांकडून जाणीवपूर्वक माझे नाव या प्रकरणाशी जोडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या आरोपांमध्ये कसलंही तथ्य नाही. भेसळ करणारी व्यक्ती, कंपनी किंवा संस्था कोणतीही असो, अशा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संबंधित यंत्रणांनी कायद्यानुसार निष्पक्ष कारवाई करावी, हीच माझी पहिल्या दिवसापासून भूमिका आहे,” असं वळसे यांनी स्पष्ट केलं आहे.

“दूध भेसळ प्रकरणात माझा कोणताही संबंध असल्याचं कोणी सिद्ध केल्यास तातडीने राजकीय आणि सामाजिक जीवनातून संन्यास घेण्यास मी तयार आहे. या संदर्भामध्ये माझे राजकीय विरोधक जाणूनबुजून ज्या गोष्टींशी माझा नाही, अशा गोष्टींशी माझा संबंध जोडून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून बदनामी करणाऱ्यांविरोधात यापुढे फौजदारी कारवाईसह अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल,” असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. “आंबेगाव-शिरूर विधानसभेसह महाराष्ट्रातील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. सत्य हेच माझे सामर्थ्य असून अंतिम विजय सत्याचाच होईल, हा मला विश्वास आहे,” असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि वळसे पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी देवदत्त निकम यांनी या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. देवदत्त निकम यांनी काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेत आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “दूध भेसळ माफियांवर कठोरातील कठोर कारवाई करा. तसंच या प्रकरणातील १३ फरार आरोपींना तात्काळ अटक करा. भेसळयुक्त दूध स्वीकारणाऱ्या प्रकल्पांवरही कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका निकम यांनी मांडली होती.

सध्या या प्रकरणावरून आंबेगाव-मंचर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून दिलीप वळसे पाटील यांनी याला केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेले ‘राजकीय षड्यंत्र’ म्हटले आहे.

दिलीप वळसे पाटील काय म्हणाले हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

https://www.facebook.com/share/v/14pK1TtSZJf/