पिंपरी- पिंपळे सौदागर येथील गणेशम सोसायटी फेस-२ येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला शुक्रवारी (दि. १८) अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी फ्लॅटमध्ये अडकलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नाना काटे यांनी तातडीने अग्निशमन व वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सदनिकेत अडकलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यासाठी जवानांनी विशेष कौशल्याचा वापर करत खिडकीच्या माध्यमातून त्यांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीमुळे फ्लॅटमधील घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याबाबत अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे.
