ब्रेकिंग न्यूज

थुंकल्याच्या कारणावरून पुण्यात तरुणांच्या दोन गटांत लोखंडी हत्याराने तुंबळ हाणामारी

Share

पुणे – रस्त्यावर समोर थुंकल्याच्या किरकोळ कारणावरून पुण्यात तरुणांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. लोखंडी हत्याराच्या उलट्या बाजूने बेदम मारहाण करण्यात आली. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मंगळवारी (१५ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, ५ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपी कृष्णा गायकवाड (वय १९), समक्ष जाधव (वय १९), आदित्य गायकवाड (वय २०), अथर्व जाधव (वय १९) आणि ओम गव्हाणे (वय १९, सर्व रा. मुंढवा) या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित सूरज कांबळे याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल रणदिवे आणि सूरज कांबळे (वय २१, दोघे रा. केशवनगर, मुंढवा) हे दोघे नेहमीप्रमाणे परिसरात असताना विशाल आणि मुख्य आरोपी कृष्णा गायकवाड (वय १९) यांच्यात समोर थुंकल्याच्या कारणावरून जोरदार बाचाबाची झाली. या क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात आरोपी कृष्णाने आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. या टोळक्याने एकत्र येत विशाल आणि सूरजला आधी हाताने बेदम मारहाण केली. त्यानंतर लोखंडी हत्याराच्या उलट्या बाजूने दोघांवर वार करून गंभीर जखमी केले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.