पुणे- उच्चभ्रू वर्गातील लोक ज्या क्लबमध्ये ‘स्टेटस’ म्हणून जेवायला जातात. त्या ‘द न्यू पूना क्लब’च्या स्वयंपाकघरातील कपाटात जिवंत झुरळे, फरशीवर उंदराची विष्ठा आढळून आल्याचे FDA ने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. या प्रकारानंतर FDA ने तात्काळ क्लबचा अन्न परवाना निलंबित केला.
एफडीएच्या पथकाने क्लबच्या किचनची अचानक झाडाझडती घेतली असता तिथेच आरोग्याशी उघड खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला. अन्न शिजवले जात असलेल्या जागेत आणि साठवणुकीच्याकपाटांमध्ये जिवंत झुरळे, किडे मोकाट फिरताना आढळले. स्वयंपाकघराच्या फरशीवर उंदराची विष्ठा पडलेली होती, ठिकठिकाणी सांडपाणी साचले होते आणि भिंतींसह ओटे तेलकट थरांनी माखले होते.
ज्या फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवले जातात, त्याच्या अगदी शेजारीच अत्यंत अस्वच्छ शौचालय आढळून आले. अन्नसुरक्षा कायद्यातील ‘शेड्यूल 4’ मधील मूलभूत नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठलीही सवलत न देता परवाना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
