पुणे- हडपसर भागात एका ३३ वर्षीय संगणक अभियंत्याने १५ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि न्यायालयात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राहुल (पूर्ण नाव समजले नाही )(वय ३३ वर्षे), हा मूळचा ओडिशा राज्यातील सुगडा गावचा रहिवासी होता आणि पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत काम करत होता. त्याने हडपसर भागातील एका उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमधील १५ व्या मजल्यावरील सदनिका भाडेतत्वावर घेतली होती. मृत राहुलचे त्याच्या पत्नीसोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. हे वाद विकोपाला गेल्याने न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती, ज्यामुळे तो मानसिक तणावाखाली फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता.
शनिवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सोसायटीच्या आवारात काहीतरी पडल्याचा आवाज रहिवाशांना आला. रहिवासी आवारात आले असता राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुल याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
