पुणे- ८२ वर्षांच्या वृद्ध बालरोगतज्ज्ञ महिलेची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या ‘केअरटेकर’ महिलेने विश्वास संपादन करून या कुटुंबाची सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी मिळून तब्बल १ कोटी ९५ लाख ४७ हजार रुपयांची संपत्ती लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
माधवी शशिकांत पवार असे या केअरटेकर महिलेचे नाव असून तिच्या विरोधात बाणेर येथील योगीपार्क परिसरात राहणारे केतन पंडित खांडेकर (वय ४७) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी माधवी शशिकांत पवार, तिचा मुलगा जोशुआ पवार आणि सून भाग्याश्री जोशुआ पवार या तिघांना अटक केली आहे.
केतन खांडेकर यांनी त्यांच्या ८२ वर्षीय आईंच्या देखभालीसाठी त्यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये माधवी शशिकांत पवार हिला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. डेक्कन परिसरातील वडिलाोपार्जित घराच्या विकास करारातून खांडेकर कुटुंबाच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाली होती. माधवीने गोड बोलून स्वतःचे नाव सहखातेदार म्हणून लावून घेतले. त्यानंतर खांडेकर आणि त्यांच्या वृद्ध आईला जिवे मारण्याची धमकी देऊन खात्यातून तब्बल १ कोटी ४५ लाख ४७ हजार रुपये काढून घेतले. इतकेच नाही तर घरातील ८५ तोळे सोन्याचे आणि ५ किलो चांदीचे दागिने चोरून नेले.
माधवी पवार हीच मुलगा जोशुआ पवार हा रिक्षाचालक असून त्याने लुबाडलेल्या पैशातून अचानक आलिशान दुचाकी आणि चारचाकी वाहने खरेदी करून मिरवत होता असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी केअरटेकर ही खांडेकर कुटुंबाची सर्व मालमत्ता आणि बँक खाती स्वतःच्या नावे करून मृत्युपत्र देण्यासाठी आई आणि मुलावर सातत्याने दबाव टाकत असल्याचे तपासात समोर आले आहे.
